Thursday, June 21, 2007

कॅच देम यंग.......

तुम्ही ती जाहिरात पाहिलीत?....एक छोटीशी "स्मार्ट'मुलगी सांगते...""ये वॉल चॉकलेटी है..क्‍यूंकी हमे चॉकलेट पसंद है...मुरब्बा नहीं !!'' किंवा मग "दाग अच्छे हैं' नाहीतर मग बॅंकेत आपली छोटीशी पिगीबॅंक विश्‍वासाने सोपवणारा तो लहान मुलगा आठवतो..?? उत्पादनं वेगवेगळी आहेत....पण टार्गेट एकच...लहान मुलं! टार्गेट म्हणजे - एकदा का लहान मुलांच्या डोक्‍यात जाहिरात बसली...की जाहिरात कंपन्यांचं काम फत्ते! मोठ्या माणसांना एखादी वस्तू विकणं किंवा एखादी गोष्ट पटवून देणं जितकं कठीण तितकंच त्यांच्याकडे हीच गोष्ट घरातल्या लहान मुलांमार्फत पोचवणं सोप्प! कारण...लहान मुलांकडील हट्ट करण्याचा "हुकमी' पत्ता! खरंतर कोणतीही गोष्ट विकत घेण्याची "पर्चेसिंग पॉवर' असते घरातल्या मोठ्या म्हणजेच कमावत्या व्यक्तींच्या हातात. मात्र कोणती वस्तू विकत घ्यायची हे सांगणारा रिमोट कन्ट्रोल मात्र घरातल्या सगळ्यात लहान मंडळींच्या हातात असतो. अगदी शाळेच्या वॉटरबॅगवर "बेब्लेड' हवं का "पोकेमॉन' हे ठरवण्यापासून ते पार बाबाची बाईक कोणती असावी, आईने कोणत्या स्टाईलचे कपडे घालावे,ते अगदी घराच्या भिंतीचा रंग ठरवण्यापर्यंत...कुठली वस्तू कोणत्या प्रकारात उपलब्ध आहे हे या मंडळींनी आधीच पाहिलेलं असतं. आणि आपण काय घ्यायचं याचाही जवळपास निर्णय झालेला असतो. ही माहिती मिळते कुठे? तर टीव्ही आहेच. शिवाय मित्रमंडळींकडे काय आहे हे पाहून आपल्याकडे काय असायला हवं हे ठरवलं जातं...मूल थोडं मोठं असेल तर मग "इंटरनेट सॅव्ही' असण्याचा फायदा होतो. ही गोष्ट जाहिरात कंपन्यांनी फार पूर्वीच हेरली...आणि जाहिरातीत काम करणारेही लहान मूल असेल तर ती जाहिरात लहानांच्याच नाही तर सगळ्यांच्याच लक्षात राहते हेही लक्षात आलं. (आठवा - ""राहुल पानी चला जायेगा''....) जाहिरात क्षेत्रातील एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या पाहणीनुसार साधारणपणे दोन वर्षांच्या बाळाला एखादा लोगो, ब्रॅण्ड वा चित्र ओळखता येते. तीन ते पाच वयोगटातील मुलं आपल्याला हीच गोष्ट हवी याचा हट्ट करू शकतात तर 5 वर्षांपेक्षा मोठी मुलं आपल्याला ही गोष्ट का हवी याची तर्कशुद्ध कारणं देऊ शकतात (मस्का!). माझ्या मित्रांकडे आहे, माझा आवडता खेळाडू जाहिरातीत आहे, ही सध्याची स्टाईल आहे..ही कारणं काहीही असोत पण ती पालकांना पटवून देण्याची ताकद या मुलांमध्ये असते आणि म्हणूनच उत्पादनांसाठी जाहिरात करताना लहान मुलांचा "ग्राहक' म्हणून विचार केला जातो. काही पालक आपल्या मुलाचा हट्ट मोडून काढण्यात यशस्वी झाले तरी यात कंपन्यांचा तोटा काहीच नसतो. कारण हट्ट आता पूर्ण झाला नसला तरी एक "प्रॉस्पेक्‍टिव्ह बायर' निर्माण करण्यात उत्पादक - जाहिरात कंपनीला यश आलेलं असतं. लहान मुलांसाठीच्याच वस्तूंबाबत बोलायचं झालं तर आपल्या आवडी-निवडी, मागण्या स्पष्टपणे मांडण्यात आजची पिढी आघाडीवर आहे. म्हणजे "मला नवा टी-शर्ट पाहिजे' अशी मागणी न होता मला "स्पायडरमॅन'चा टी-शर्ट पाहिजे अशी मागणी होते. एखाद्या बेब्लेडची मागणी न होता बेब्लेड आणि स्टेडियम हवं असतं...एकूणच उत्पादनं या मुलांच्या संपूर्ण आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे एखादं लहान मूल झोपेतून उठतं तेव्हा नाईटड्रेसवर कार्टून असतात, दात घासायला कोणत्यातरी कंपनीचा खास "किडी' ब्रश असतो, आंघोळीच्या साबणाला पण कार्टूनचा आकार असतो, शॅम्पू तुमच्या डोळ्यांतून पाणी काढणार नाही याची हमी जाहिरातीने दिलेली असते, स्मार्ट बनवणाऱ्य्‌ा "कॉर्नफ्लेक्‍स' चा ब्रेकफास्ट, शाळेत जातानाची बॅग पुन्हा कोणत्यातरी सुपरहिरोची असते, वॉटरबॉलच्या जागी खेळाडूंसारखा स्टायलिश "सिपर' असतो, डब्यामध्ये "ब्रॅण्डेड' वेफर्स, संध्याकाळी खेळताना कोणत्यातरी हिरो किंवा हिरोईनसारखी स्टाईल असते आणि डिस्नेचे वा तत्सम वॉलपेपर पाहत रात्री झोप लागते...प्रत्येक प्रक्रियेत कोणते ना कोणते उत्पादन महत्त्वाचे! आणि म्हणूनच हे बाल ग्राहकही महत्त्वाचे. म्हणून तर आज बाजारात लहान मुलांसाठीची खास उत्पादने मोठ्या संख्येत आहेतच पण सामान्य उत्पादनांमध्येही लहान मुलांसाठी वेगणी श्रेणी असते. हे सगळं लक्षात घेऊन मग कंपन्या आपल्या वस्तूंची जाहिरात करताना बाल ग्राहकांना मान देतात. वस्तू लहानांसाठी, मोठ्यांसाठी का कुटुंबाच्या वापराची ही बाब वेगळी. म्हणूनच मग "मॅकडॉनल्ड' सारख्या फास्ट फूड कंपनीकडे इतका मोठा मेन्यू असताना मुख्यत्वे जाहिरात होते ती "हॅप्पी मील' आणि त्याबरोबर मिळणाऱ्य्‌ा खेळण्याची ! म्हणजे मग बाहेर खायला जायचं ठरल्यावर मुलांकडून हट्ट होतो तो मॅकडॉनल्डमध्ये जायचा....किंवा मग खरेदीसाठी अजिबात कुरकुर न करता यायची तयारी असते कारण त्या मॉलमध्ये हेच रेस्टॉरंट असतं. अगदी डेम्लर-क्रायस्लर पासून ते निस्सान-शेवर्ले पर्यंतच्या मोटार कंपन्यांनीही लहान मुलांना दुर्लक्षित न करता वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आपल्या गाड्यांविषयी माहिती देण्याची पद्धत अवलंबली आहे. ग्राहक म्हणून मुलांचा विचार करताना कंपन्यांकडून तीन मार्गांनी हा विचार होतो. पहिला मार्ग म्हणजे मुलांकडून स्वतः केला जाणारा खर्च. आपल्याकडे हा बहुतेकदा पॉकेटमनीतून येणाराच असला तरी परदेशात मात्र पॉकेटमनीसोबत मुलं स्वतः काही पैसे मिळवत असल्याने ही बाब महत्त्वाची ठरते. आई-बाबा खर्च करत असताना खर्च कुठे करायचा ते ठरवण्याची दिशा वा मुलांची निर्णयक्षमता ही दुसरी बाब. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याचा भविष्यात होणारा परिणाम. लहान वयातच तयार होणारी मतं आणि ब्रॅण्ड लॉयल्टी ही भविष्यात निर्णय घेताना खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे लहान मुलांवरच आपल्या उत्पादनांचा "इम्पॅक्‍ट' तयार करण्याकडे जाहिरातदारांचा कल असतो. लहानपणापासून असा "घडवण्यात' आलेला ग्राहक मोठा झाल्यावर दुसरी जाहिरात पाहून त्या उत्पादनांकडे वळण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे सध्या जवळपास 70 टक्के जाहिराती या लहान मुलांना समोर ठेवून तयार करण्यात येतात. जाहिरातीत दाखवण्यात येणारी प्रत्येक गोष्ट चांगली का वाईट हे प्रत्येक वेळी मूल ठरवू शकत नाही. साधारण नऊ-दहा वर्षांपर्यंतचं मूल त्या जाहिरातीवर विचार करतं. पण त्यापेक्षा लहान मुलांसाठी दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी भासणारी असते. अशावेळी ती गोष्ट हातात पडल्यावर मोठा अपेक्षाभंग होण्याची शक्‍यताच जास्त असते. अशावेळी मग पैसे फुकट गेले म्हणून त्या लहानग्यावर न चिडता असं पुन्हा होणार नाही याची काळजी कशी घ्यावी हे पालकांनी लक्षात आणून देणं महत्त्वाचं ठरतं. हा एक अनुभव नीट हाताळून मुलांची निर्णयक्षमता, योग्य-अयोग्याचा विचार करण्याची प्रक्रिया विकसित करता येते. जाहिरात पाहून होणाऱ्या मागण्यांना नियंत्रण घालतानाच ते का ? हे समजवणं महत्त्वाचं आहे. एखादी वस्तू घेताना ती किती महत्त्वाची आहे, तिची किंमत किती, वस्तू खरंच वापरली जाणार का? हे सगळं जाहिरात सांगणार नाही. ते पालकांनीच समजवायला हवं. सगळ्याच जाहिराती वाईटच असतात असं नाही. (पूरबसे सूर्य उगा - राष्ट्रीय साक्षरता मिशन) पण चांगलं काय हे लहानांनाही ओळखता येणं महत्त्वाचं आहे. उत्पादक आणि जाहिरात कंपन्या मुलांमधला ग्राहकच घडवत असतात. अशावेळी मुलांचे सारे हट्ट पुरवण्याच्या नादात मुलांमधून सुजाण नागरिक आपल्याला घडवायचाय हे पालकांनी विसरायला नको. सो...."कॅच देम यंग!'
सुरेख आणि सुरेल

शास्त्रीय संगीत, त्यातले राग आणि त्यांचे गायक या विषयीच्या लेखांचे पुस्तक...म्हणजे साधारण काय चित्र डोळ्यांपुढे येतं..?? तर जुन्या बांधणीतलं पुस्तक, प्रत्येक रागानुसार किंवा त्याच्या वेळेनुसार केलेली प्रकरणांची विभागणी...आणि रागाचं नाव, थाट, वादी, संवादी, आरोह-अवरोह अशी होणारी प्रत्येक प्रकरणाची सुरुवात !! या सगळ्या प्रकरणाला छेद देत शास्त्रीय संगीताविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल, तर "नादवेध' वाचून पाहा... अच्युत गोडबोले आणि सुलभा पिशवीकर या दोघांच्या लेखमालेचे हे पुस्तक. शास्त्रीय संगीतातलं काही कळण्यासाठी संगीताची भाषा समजावी लागते आणि खूप काही बारकावे कळावे लागतात, अशी तुमची समजूत असेल तर पुस्तकाच्या सुरुवातीलाच हा समज गळून पडतो. कारण आपल्या मनोगतातच गोडबोले म्हणतात, ""मला गाण्यातल्या पंडितांपेक्षा गाण्यावर प्रेम करणारेच नेहमी जवळचे वाटत आलेले आहेत. रागदारीतलं काही "कळण्यापेक्षा', त्यातलं "भावण्याच्या' दृष्टीनं "ऐकणं' जास्ती महत्त्वाचं आहे.'' आणि या पुस्तकातले लेखही याच स्वरूपात आणि याच भावनेने लिहिलेले आहेत. शास्त्रीय संगीताच्या अगदी उगमापासून ते यातील वेगवेगळे राग आणि या रागातल्या रचनांविषयी या लेखांमध्ये खूप काही माहिती आहे. वेगवेगळ्या रागांच्या उगमाबद्दलच्या कथा, या रागातील रचनांबद्दल माहिती आहेच; पण हे राग गाताना मोठ्या गायक-वादकांबाबत घडलेले किस्सेही लेखकद्वयी अगदी ओघात सांगून जाते. भैरव, मल्हार, मारव्यापासून ते अगदी बिलावल - पटदीपपर्यंतच्या सगळ्या रागांवर या लेखमालेत चर्चा आहे. मग यात "भैरव'विषयी बोलताना नुसता "भैरव' असा उल्लेख न होता "भैरवकुला'चा उल्लेख होतो आणि त्यात कालिंगडा, रामकली, जोगिया या भैरव रागाच्या प्रकारांची माहितीही आहे. त्यातही कोणत्या प्रकाराचा स्वभाव कसा आहे, कुठे भैरवपेक्षा थोडे वेगळे सूर लागतात, इथपर्यंतचे तपशील या लेखात मिळतात. कोणत्या गायकाने गायलेला कोणता राग हा आवर्जून ऐकण्यासारखा आहे, एकच राग वेगवेगळे गायक कोणत्या पद्धतीने गातो याचे फार सुंदर विश्‍लेषण या लेखांमध्ये आहे. यात अगदी पंडित पलुस्कर, मोगूबाई कुर्डूकरांपासून ते आताच्या आरती अंकलीकर, संजीव अभ्यंकरांपर्यंत सर्वांचे उल्लेख येतात. रागांविषयी बोलताना विशिष्ट रागाच्या स्वरसंचाबद्दल किंवा त्या रागाच्या स्वभावाबद्दल चर्चा ही होतेच. या रागात कोणत्या प्रसिद्ध रचना बांधल्या गेल्या आहेत याचीही चर्चा होते, पण या लेखांबाबतीत एक गोष्ट वेगळी आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वेगवेगळे भाव अचूक टिपणाऱ्या अनेक कवितांचा उल्लेख या लेखांमध्ये आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर महानोरांच्या कवितेच्या ओळी आहेत,
"फुलात न्हाली पहाट ओली,
क्षितिजावरती रंग झुले,
नभात बिजल्या केशरियाचे,
रंग फुलांवर ओघळले.'
या ओळींमध्ये लेखकांना "भटियार' रागाचे रंग दिसतात. सूर्योदयाच्या वेळी गायल्या जाणाऱ्या या रागाचे रूप या कवितेत आहे हे आपल्यालाही चटकन भावते. कवितांचे असे सुंदर उल्लेख आणि तुलना बहुतेक लेखांमध्ये आहेत. एखाद्या रागाविषयी चर्चा करताना नुसतीच त्या रागातील शास्त्रीय चिजांची चर्चा न करता, त्या त्या रागाचे वैशिष्ट्य दाखवणाऱ्या वा या रागात बांधलेल्या अनेक हिंदी-मराठी गाण्यांचे संदर्भ या लेखांमध्ये येतात. "पूरबसे सूर्य उगा, फैला उजियारा जागी सब दिशा दिशा, जागा जग सारा' ही गाजलेली जाहिरात आठवते? "भटियार' विषयी बोलताना माणिक वर्मांच्या "बरनी न जाय' या बंदिशीचा उल्लेख तर आहेच, पण फार पूर्वी गाजलेली ही साक्षरता प्रसाराची जाहिरातही "भटियार'मध्ये आहे, हा संदर्भ दाद देण्याजोगा आहे. रागांवर आधारित हिंदी-मराठी चित्रपटगीते, भावगीते आणि नाट्यगीतांची यादी परिशिष्टांच्या स्वरूपात पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली आहे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे, यात नुसत्या जुन्या जमान्यातल्या गाण्यांचे उल्लेख नाहीत, तर अगदी आताच्या गाण्यांचे उल्लेख आहेत. अगदी "उडनखटोला' पासून ते शंकर महादेवनच्या "ब्रेथलेस'पर्यंत ! शास्त्रीय संगीतासारखा विषय तसा समजवण्यासाठी अवघडच. पण असा विषय कुठेही कंटाळवाणा होऊ न देता अतिशय रंजकतेने मांडल्याबद्दल सुलभा पिशवीकर आणि अच्युत गोडबोले यांना "दाद' द्यायलाच हवी. सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या गोडबोलेंचे वेगळेच रूप या लेखांतून पुढे येतं. हे सर्व लेख अभ्यासपूर्ण आहेत आणि पुस्तकाच्या शेवटी असणारी संदर्भग्रंथांची यादी पाहता या लेखांसाठी घेण्यात आलेली मेहनतही मानायलाच हवी. "नादवेध' वाचताना यात उल्लेख येणारी गाणी अगदी नकळत गुणगुणली जातात. दोन गाणी गुणगुणल्यावर या गाण्यांतलं साम्य आणि रागाची झलक आपल्याही लक्षात येते. पण पहिली दोन गाणी आठवली आणि तिसरं आठवलं नाही तर अस्वस्थ व्हायला होतं. मग हे गाणं मिळवण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपण "झपाटून' जातो. असं हे "झपाटून' जाणं अनुभवायचं असेल तर "नादवेध' नक्की वाचा !
आधुनिक रक्तपेढी

ऐन इमर्जन्सीच्या वेळी रक्तासाठी धावाधाव करायला लागणे काळजीत भर टाकणारे असते. त्यातूनही ज्या गटाचे रक्त हवे तो दुर्मिळ असेल, तर दुष्काळात तेरावा महिना. त्यातून जर एखाद्या रक्तपेढीत रक्त उपलब्ध असेल, तर ते मिळण्यासाठी आधी तिथे एखादा रक्तदाता उभा करावा लागतो. रक्तदात्यांसाठी आणि रक्ताची गरज असणाऱ्यांसाठी या सगळ्यापेक्षाही वेगळा असा एक पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय आहे एक वेबसाइट! http://www.indianblooddonors.com या वेबसाइटमुळे आता रक्त मिळविण्याची प्रक्रिया सोपी झालेली आहे. या साइटद्वारे रक्त मिळविण्याची प्रक्रियाही अगदी सोपी आहे. रक्तदात्यांसाठी या वेबसाइटवर एक सदस्यत्वाचा फॉर्म आहे. असे सुमारे 35000 रक्तदाते सध्या या वेबसाइटचे सदस्य आहेत. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीस रक्ताची गरज भासेल, त्या व्यक्तीने या वेबसाइटवर आपली गरज "पोस्ट' करायची. या व्यक्तीला वेबसाइटद्वारे एक ब्लड रिक्वेस्ट आयडी मिळतो. हा आयडी घेऊन पेशंटने मग साइटच्या टीमला फोन करायचा. या फोनवर तुम्ही खरंच गरजू असल्याची खातरजमा करून मग पुढची प्रक्रिया सुरू होते. एखादी गरज नोंदविली गेल्यानंतर या वेबसाइटच्या सदस्यांना संपर्क केला जातो. गरजू व्यक्तीच्या मागण्या पूर्ण करू शकतील आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर पोचू शकतील अशा व्यक्तींना एसएमएस आणि ई-मेलद्वारे संपर्क केला जातो. ज्या रक्तदात्यांना रक्त देणे शक्‍य असेल, ते याच एसएमएस वा ई-मेलला उत्तर देऊन आपला निर्णय कळवितात. इच्छुक रक्तदात्याला मग गरजू व्यक्तीचा संपर्क दिला जातो आणि मग पुढे ही प्रक्रिया पूर्ण होते. आपण नोंदविलेल्या मागणीचा आत्ताचा स्टेटस्‌ही पाहण्याची सोय या वेबसाइटवर आहे. नागपूरच्या खुश्रू पोचा यांच्या कल्पनेतून पाच वर्षांपूर्वी ही वेबसाइट सुरू झाली. सध्या या वेबसाइटचे 35 हजार सदस्य असून दररोज 50-60 नवीन सदस्यांची नोंदणी होत असल्याची माहिती पोचा यांनी दिली. रोज जवळजवळ 25 गरजू व्यक्ती या वेबसाइटवर रक्तासाठी मागणी नोंदवतात. बोगस पेशंट किंवा मधल्या मधे पैसे कमावण्याचा प्रयत्न करणारे एजंट यांच्याकडून फसवणूक होऊ नये म्हणून या वेबसाइटकडून विशेष काळजी घेतली जाते आणि मग त्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. एखाद्या व्यक्तीला काही दिवसांतच पुन्हा गरज लागली, तर त्याच आयडीवरून ही प्रक्रिया पुन्हा करता येते आणि आपली मागणी नोंदवितानाच त्या शहरात किती रक्तदाते आहेत, याचाही आकडा गरजू व्यक्तीला कळू शकतो. अनेक लहानलहान शहरांमध्येही या वेबसाइटचे नोंदणीकृत सदस्य आहेत. या वेबसाइटद्वारे तुम्ही रक्तदाता म्हणूनही लोकांपर्यंत पोचू शकता किंवा इतर मार्गांनीही या वेबसाइटला मदत करू शकता. या वेबसाइटच्या हेल्पलाइनसाठी तुम्ही तुमचा वेळ, कौशल्य पुरवू शकता किंवा पैशांच्या स्वरूपातही देणगी देऊ शकता.
संपर्कासाठी पत्ता ः खुश्रू पोचा, 127, न्यू कॉलनी, नागपूर- 440001.
दूरध्वनी- 9860510099
http://www.indianblooddonors.com

Sunday, June 17, 2007

स्टाइलमे रहेनेका...!

"एक नूर आदमी, दस नूर कपडा' असं तर फार पूर्वीपासूनच म्हटलं जायचं. पण आजकाल कपड्यांबरोबर "आदमी'च्या "गॅजेट्‌स'चाही नूर जोखला जातो... त्याच्या दिसण्यावरून, त्यांच्या मॉडेल्सवरून तुमची स्टाइल स्टेटमेंट ठरते.
एखाद्या व्यक्तीला आपण पहिल्यांदा भेटतो किंवा पाहतो, त्या वेळी त्या व्यक्तीविषयी कोणत्या गोष्टी लक्षात राहतात? तर त्या व्यक्तीचं बोलणं, कपडे हे सारं तर राहतंच; पण तिचा स्टायलिश मोबाईल, गळ्यातला-खिशातला आयपॉड, खांद्यावरच्या लॅपटॉपचा "मेक' हेही हल्ली स्टाइल स्टेटमेंट ठरतंय.... आयुष्यामध्ये या विविध गॅजेट्‌स अगदी महत्त्वाच्या झाल्या आहेत. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "इनसे अपना पाला पडता है!' म्हणजे मॉर्निंग वॉकला जाणारी व्यक्ती आता हातात वॉकमन घेऊन न जाता, मनगटावर किंवा दंडावर छोटासा "एमपी3' प्लेयर लावून धावते...कधी इयरप्लग्स, तर कधी वायरलेस हेडफोन... "सोनी'चे खास व्यायाम करणाऱ्यांसाठीचे "एमपी3' तर व्यायाम करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मोजतात, किती कॅलरीज "बर्न' झाल्या ते दाखवतात....शिवाय ते खास "स्पोर्टिंग' स्टाइलने असतात! म्हणजे ते स्पोर्टसमनला अगदी शोभून दिसतात! हे झालं एक उदाहरण; पण अक्षरशः तुमच्या प्रत्येक स्टाइलला आणि प्रत्येक व्यक्तीला शोभून दिसतील अशा गॅजेट्‌स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. एखाद्या गॅजेटच्या वापरासोबतच त्या वस्तूचा "लुक' देखील त्याच्या खरेदीमागील महत्त्वाचं कारण असतं. कारण आजकाल प्रत्येक गोष्टीचा "स्टाइल कोशंट' असतो. मोबाईलचा खरा वापर कॉल करता येण्यापुरता. पण आपल्या फोनमध्ये किती मेगापिक्‍सेलचा कॅमेरा आहे किंवा किती मेमरी आहे याच्याइतकंच त्या फोनचं "स्लीक' ऍण्ड "स्टाइलिश' असणंही महत्त्वाचं असतं. मारिया शारापोवाने "मोटो रेझर'ची जाहिरात केली, पण ही जाहिरात फोनच्या फिचर्सची नव्हती तर ती त्या फोनच्या "पिंक' असण्याची होती. मोबाईल फोनच्या जगतामध्ये ते एक स्टाइल स्टेटमेंट होतं. मोठ्या "बल्की' हॅण्डसेट्‌सची जागा "कटिंग एज' मोबाईल्सनी घेतली ती या स्टाइलच्या जोरावरच! बाजारात सुरवातीला ब्लॅकबेरी आला तो केवळ "बिझनेस'ची गरज लक्षात घेऊन. हा फोन अगदी मर्यादित लोकांपर्यंतच पोचला. पण मोत्यासारखा स्क्रोलर असणाऱ्या "ब्लॅकबेरी पर्ल'ला मात्र धडाकेबाज प्रतिसाद मिळाला. सगळ्या "एमपी3' प्लेयरपेक्षा आयपॉड हिट झाला तोही स्टाइलच्या जोरावरच. कारण त्याची "साउंड क्वालिटी' जितकी छान होती तितकेच त्याचे लुक्‍सही! स्टाइलिश- स्लीक मेटालिक आयपॉड सगळ्यांनाच आवडला. गॅजेट्‌स आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झालाय. अगदी महत्त्वाचे क्षण टिपून घेण्यासाठी लागणारा डिजिटल कॅमेराही यातून सुटलेला नाही. कारण हा कॅमेरा वापरासाठी जितका सुटसुटीत असावा लागतो, तितकाच लुक्‍सनेही छान असावा लागतो. त्याची लेन्स किती मेगापिक्‍सेची आहे, यासोबतच डिस्प्ले पॅनलही महत्त्वाचे ठरते. आपल्याकडे एक स्टाइल स्टेटमेंट म्हणून एखादी वस्तू आपण बाळगतो. ही वस्तुस्थिती आपण पटकन स्वीकारत नाही... पण "सोनी व्हायो'चे लेटेस्ट लॅपटॉप पाहिले तर ही गोष्ट लक्षात येते. आतापर्यंत फक्त काळ्या किंवा ग्रे रंगात येणारे लॅपटॉप सोनीने चक्क "पिंक' आणि "मिंट' रंगामध्ये बाजारात आणले. खास "सिझन्स कलर्स' नावाने! अगदी आतापर्यंत फक्त "वेळ पाहण्याचे साधन' असलेलं घड्याळ देखील विविध स्टाईल्स आणि विविध ब्रॅण्डसमुळे भाव खाऊन जाते. या सगळ्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंसोबतच त्यांच्या ऍक्‍सेसरीजदेखील महत्त्वाच्या असतात. कारण या वस्तूंना आपल्याला हवं तसं रूप देण्यासाठी या ऍक्‍सेसरीज महत्त्वाची भूमिका बजावतात. मग यामध्ये मोबाईलची कव्हर्स, वेगवेगळ्या रंगाची पॅनेल्स, एमपी3 प्लेयर्स, बेल्ट्‌स, स्ट्रॅप्स, स्लिंग बॅग्ज अशा किती तरी वस्तू येतात. अगदी तुम्हाला लॅपटॉप केस घ्यायची झाली तर त्यातली कॉर्पोरेट लुकसाठी "प्युअर लेदर'ची केस किंवा मग एकदम मॉडर्न लुकवाली बॅगपॅक. काय घ्यायचं, हे तुम्ही ठरवायचं! आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट सोपी करण्यासाठी, लहान लहान गोष्टींमध्ये मोठा आनंद मिळवून देण्यासाठी या गॅजेट्‌स आपण बनवल्या, स्वीकारल्या. उपयोगासोबतच स्टाइल म्हणूनही त्या आपल्या आयुष्याचा एक भाग झाल्या... पण या सगळ्या स्टाईलस्‌मध्ये माणूस तर हरवत नाहीये ना, याची काळजी मात्र घ्यायला हवी!
दीवान- ए- "आम'!

आंबा म्हणजे गंध....
आंबा म्हणजे रस....
आंबा म्हणजे रूप...
आंबा म्हणजे आढी....
आंबा म्हणजे उभारलेली गुढी!


आंबा... त्याचा तो खोलवर भरून घ्यावासा वाटणारा मस्त वास आठवला की, त्या त्या गंधाबरोबर जुळलेल्या आठवणीही जाग्या होतात.......
आंबा हे फक्त "आम' फळ नाहीच... ह्रदयात कायम जपावा असा ठेवाच आहे तो...! उन्हाळ्यातला एक नेहमीचा दिवस... तळपता सूर्य आणि निथळत्या घामाने आलेला वैताग, ऑफिस, काम, प्रवास हे सगळं करून घरी शिरल्या शिरल्या एक विशिष्ट घमघमाट नाकात घुसतो...आणि हा सुगंध सुखावणारा असतो...घरात आलेल्या पहिल्या आंब्याचे हे संकेत असतात...काय गंमत आहे...आपल्याकडे इतक्‍या वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या चवींची फळं आहेत...पण कौतुक करवून घेणारं असं हे एकच फळ...आणि त्याच्या त्याच्या तऱ्हाही किती...या फळाचेच इतके प्रकार आहेत आणि हे प्रकार वापरून तयार केले जाणारे पदार्थही किती... साधारण जानेवारीच्या सुमारास एक बातमी हमखास पहिल्या पानावर झळकते..."आंबा आला!' आगमनाची अशी वर्दी देत येणारा हा एकच राजा! पिकल्या फळाची गोडी जितकी अवर्णनीय तितकीच त्याच्या कच्चा रूपाचीही. हिरव्यागार रंगाच्या आंबट कैऱ्यांना आपल्याकडे खास मान आहे. चैत्रगौरीच्या हळदीकुंकवापासून या सोहळ्याला सुरुवात होते. आंबेडाळ, पन्हं ही चैत्रगौरीची खिरापत असते, तर ताज्या कैऱ्यांचं लोणचं गुढीपाडवा - अक्षय्य तृतीयेला जेवणात मानाचं स्थान मिळवतात. खरं तर हे फळंच असं की ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पानाच्या प्रत्येक भागात हजेरी लावू शकतं आणि लावतंही...म्हणजे जेवणापूर्वी पन्हं, जेवणात चटण्या, कोशिंबिरींमध्ये कैरीचं लोणचं, मोरंबा, छुंदा....गोडाच्या डाव्या भागात आमरसाची वाटी, आंबा बर्फी...मुख्य जेवणात कैरीची कढी...नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी करंदी वा कोलंबीच्या कालवणात कैरी....जेवणानंतरच्या फळांमध्ये आंबा कापून...डेझर्ट म्हणून मॅंगो कुल्फी...मॅंगो सॉर्बे...मॅंगो शेक...यादी न संपणारी आहे.... आंब्यांचे प्रकार तरी किती...पिवळा धम्मक रंगाचा हापूस, लालसर रंगाची एक इटुकलं टोक असणारी पायरी...हिरवा-पिवळा रायवळ...वेगळाच आकार आणि नाव असणारा "बाटली' आंबा...तोतापुरी, पिकल्यावरही हिरवाच राहणारा लंगडा आणि केशर....पिवळ्या रंगाचा मोठ्ठा बदामी आंबा..पिवळट बसका रुमाली...मोरंब्यासाठी फेमस राजापुरी...किती तरी प्रकार...तोंडाला पाणी आणणारे. भारताबाहेर राहिल्याने अस्सल आंबा खायला न मिळणाऱ्यांचं हळहळणं पाहिलं की मग आंबा खाण्यातलं सुख कळतं....आंबा "एन्जॉय' करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते...काहींना तो व्यवस्थित कापून, फोडी करून खायला आवडतं...आंबा कापून त्याच्या फोडी करायच्या..एका छानशा बाऊलमध्ये या फोडी ठेवायच्या वर व्हॅनिला आइस्क्रीमचा भलामोठा स्कूप घालायचा...तो थोऽऽडा विरघळू द्यायचा...आणि मग या डिशवर हल्लाबोल! अहाहा...!!! पण आंबा चोखून खाण्यात जी मजा आहे ती बाकी कश्‍शा-कश्‍शात नाही...आंबा चोखून खाताना दोन बोटांच्या मधून रस ओघळून ड्रेसवर सांडल्याशिवाय आयुष्य सार्थकी लागत नाही... जी तऱ्हा आंब्याची तीच आंब्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांची...त्यात पहिला नंबर पायरीचा! पायरीचा आमरस करताना त्या रसाला जी गोडी असते त्यापेक्षाही जास्त गोडी असते ती त्या रस पिळून काढलेल्या साली आणि बाठे चोखण्यामध्ये! आंबा घालून केलेला गोडशिरा खातानाही पोटात नेहमीपेक्षा चार घास जास्तच जातात. मस्तपैकी मोहरी लावून केलेली कैरीची कढी ठसका देऊन जाते, तर गोऽऽड मोरंबा अगदी आपल्या आवडीची भाजीही नावडती ठरवायला लावतो... कोणत्याही रूपामध्ये "आपला' वाटणारा हा आंबा खरं तरं आला पूर्वेकडच्या देशांतून. असं म्हणतात की बर्मा, सयाम, इंडोनेशिया या पट्ट्यामध्ये आंब्याने जन्म घेतला. काहींचं म्हणणं मात्र थोडं वेगळंय. ते म्हणतात हापूसचं कलम आलं मेक्‍सिकोमधून. कुठून का येईना, ते कोकणात रुजल्यानंतर त्याला चढलेली गोडी काही निराळीच! खुद्द मेक्‍सिको, बर्मातल्या आंब्यालाही काही त्याची सर येणार नाही!!! आंब्याला आपलंसं करणाऱ्या प्रत्येकाला या आंब्याने काही ना काही तरी दिलं. पिकवणाऱ्याला रोजगार आणि खाणाऱ्याला आनंद! आंबा या एका फळामध्ये किती जणांना आणि किती प्रकारचा रोजगार मिळतो आणि ही इंडस्ट्री किती मोठी आहे, याची कल्पना आकडे पाहिल्यानंतर येते. आंबा निर्यात तर केला जातोच; पण आंबा पोळी, आंबोशी, कॅन्ड आमरस, पल्प, तयार पन्हं या उद्योगामध्ये अनेकांना रोजगार मिळतो. कोकणातला आंबा बागाईतदार हा त्या झाडांवर मुलांप्रमाणे प्रेम करतो. वेळी - अवेळी पडणारा पाऊस त्याच्या हृदयाचा ठोका चुकवतो. झाडावरून फळं उतरवून त्याची आढी घालेपर्यंत त्याच्या जीवाला शांती नसते. आंब्याचा व्यापार करणाऱ्याच्या बाबतीतही हेच. आपल्याकडे आलेलं फळ ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत सर्वोत्तम असावं हीच त्याची धडपड असते. जातीचा आंबा विक्रेता कधीही पेटीला "पुडी' लावत नाही. आंबे लवकर पिकण्यासाठी "पावडर' द्या सांगणाऱ्या ग्राहकालाही तो दम देतो. आंबा नीट पिकण्यासाठी जितकी काळजी विक्रेत्याला घ्यायला लागते तितकीच घरी पेटी आणणाऱ्यालाही. कारण आंब्याची पेटी नीट लावणं ही वाटतं तितकी साधीसुधी गोष्ट नाही. त्यातही एक कला आहे. सगळे आंबे बाहेर काढून त्यांची वर्गवारी करायची. अगदी कच्चे आंबे एकदम तळाशी...मग त्यावर पेंढा...त्यावर मध्यम पिकलेले आंबे आणि पेंढा..आणि सगळ्यात वर तयार आंबे... हे सगळे आंबेही एकाच दिशेने लावायचे..तेही एकमेकांना स्पर्श होऊ न देता. कारण एक आंबा खराब झाला तर त्याच्या आजूबाजूचेही खराब होणार... आपल्या खाद्य जीवनात आंब्याला जितकं महत्त्वाचं स्थान आहे, तितकंच आंब्याच्या झाडालादेखील! सण कोणताही असो तोरणामध्ये आंब्याची डहाळी असतेच! मंगलकलशामध्ये श्रीफलासोबत आंब्याचीच पानं असतात आणि शुद्धीसाठी घरभर या मंगलकलशातल्या पाण्याचा शिडकावा होतो तोही आंब्याच्या पानानेच! आंब्याच्या झाडाकडे कधीही पाहा...ते मलूल दिसत नाही. मग त्याला नव्याने आलेली तांबूस पालवी असो की मोठी जून झालेली हिरवीगार पानं. मोहरलेला आंबा किंवा हिरव्यागार कैऱ्यांनी लगडलेला...प्रत्येक रूप सुखावणारंच असतं...! या झाडाची फळंही बहुतेक हाच संदेश देत असावीत...वर्षातून काहीच महिने मिळणारं हे फळ नाना चवी आणि रूपांतून वर्षभराचा आनंद देऊन जातं. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे किती पैलू असू शकतात, हे आंब्याच्या उदाहरणावरून शिकण्यासारखं आहे. बाजारात असूनही सध्या मध्यमवर्गाच्या आवक्‍याबाहेर असलेला आंबा लवकरच घराघरात येईल, तेव्हा यंदा जेवण थोऽडं कमी करून आंब्याचा आस्वाद घ्या... येणारा मोसम तुम्हाला "आंबामय' जावो.....

Friday, June 08, 2007

एक नवी सुरुवात
आयुष्यात मी कधी लिहिण्याच्या प्रोफेशनमध्ये येईन असं वाटलं नव्ह्तं. पण मी चक्क पत्रकार झाले....शाळेत कधी होमवर्क देखील वेळेत पूर्ण केला नव्हता....आता तर रोज रोज लिहीते...गंमत आहे खरी!हा ब्लॉग सुरु करेन असा गेले कित्येक दिवस म्हणत होते. पण सूर आज जुळलेत. पण आता नक्की लिहीणार...वाचत रहा...