Sunday, June 17, 2007

दीवान- ए- "आम'!

आंबा म्हणजे गंध....
आंबा म्हणजे रस....
आंबा म्हणजे रूप...
आंबा म्हणजे आढी....
आंबा म्हणजे उभारलेली गुढी!


आंबा... त्याचा तो खोलवर भरून घ्यावासा वाटणारा मस्त वास आठवला की, त्या त्या गंधाबरोबर जुळलेल्या आठवणीही जाग्या होतात.......
आंबा हे फक्त "आम' फळ नाहीच... ह्रदयात कायम जपावा असा ठेवाच आहे तो...! उन्हाळ्यातला एक नेहमीचा दिवस... तळपता सूर्य आणि निथळत्या घामाने आलेला वैताग, ऑफिस, काम, प्रवास हे सगळं करून घरी शिरल्या शिरल्या एक विशिष्ट घमघमाट नाकात घुसतो...आणि हा सुगंध सुखावणारा असतो...घरात आलेल्या पहिल्या आंब्याचे हे संकेत असतात...काय गंमत आहे...आपल्याकडे इतक्‍या वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या चवींची फळं आहेत...पण कौतुक करवून घेणारं असं हे एकच फळ...आणि त्याच्या त्याच्या तऱ्हाही किती...या फळाचेच इतके प्रकार आहेत आणि हे प्रकार वापरून तयार केले जाणारे पदार्थही किती... साधारण जानेवारीच्या सुमारास एक बातमी हमखास पहिल्या पानावर झळकते..."आंबा आला!' आगमनाची अशी वर्दी देत येणारा हा एकच राजा! पिकल्या फळाची गोडी जितकी अवर्णनीय तितकीच त्याच्या कच्चा रूपाचीही. हिरव्यागार रंगाच्या आंबट कैऱ्यांना आपल्याकडे खास मान आहे. चैत्रगौरीच्या हळदीकुंकवापासून या सोहळ्याला सुरुवात होते. आंबेडाळ, पन्हं ही चैत्रगौरीची खिरापत असते, तर ताज्या कैऱ्यांचं लोणचं गुढीपाडवा - अक्षय्य तृतीयेला जेवणात मानाचं स्थान मिळवतात. खरं तर हे फळंच असं की ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पानाच्या प्रत्येक भागात हजेरी लावू शकतं आणि लावतंही...म्हणजे जेवणापूर्वी पन्हं, जेवणात चटण्या, कोशिंबिरींमध्ये कैरीचं लोणचं, मोरंबा, छुंदा....गोडाच्या डाव्या भागात आमरसाची वाटी, आंबा बर्फी...मुख्य जेवणात कैरीची कढी...नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी करंदी वा कोलंबीच्या कालवणात कैरी....जेवणानंतरच्या फळांमध्ये आंबा कापून...डेझर्ट म्हणून मॅंगो कुल्फी...मॅंगो सॉर्बे...मॅंगो शेक...यादी न संपणारी आहे.... आंब्यांचे प्रकार तरी किती...पिवळा धम्मक रंगाचा हापूस, लालसर रंगाची एक इटुकलं टोक असणारी पायरी...हिरवा-पिवळा रायवळ...वेगळाच आकार आणि नाव असणारा "बाटली' आंबा...तोतापुरी, पिकल्यावरही हिरवाच राहणारा लंगडा आणि केशर....पिवळ्या रंगाचा मोठ्ठा बदामी आंबा..पिवळट बसका रुमाली...मोरंब्यासाठी फेमस राजापुरी...किती तरी प्रकार...तोंडाला पाणी आणणारे. भारताबाहेर राहिल्याने अस्सल आंबा खायला न मिळणाऱ्यांचं हळहळणं पाहिलं की मग आंबा खाण्यातलं सुख कळतं....आंबा "एन्जॉय' करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते...काहींना तो व्यवस्थित कापून, फोडी करून खायला आवडतं...आंबा कापून त्याच्या फोडी करायच्या..एका छानशा बाऊलमध्ये या फोडी ठेवायच्या वर व्हॅनिला आइस्क्रीमचा भलामोठा स्कूप घालायचा...तो थोऽऽडा विरघळू द्यायचा...आणि मग या डिशवर हल्लाबोल! अहाहा...!!! पण आंबा चोखून खाण्यात जी मजा आहे ती बाकी कश्‍शा-कश्‍शात नाही...आंबा चोखून खाताना दोन बोटांच्या मधून रस ओघळून ड्रेसवर सांडल्याशिवाय आयुष्य सार्थकी लागत नाही... जी तऱ्हा आंब्याची तीच आंब्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांची...त्यात पहिला नंबर पायरीचा! पायरीचा आमरस करताना त्या रसाला जी गोडी असते त्यापेक्षाही जास्त गोडी असते ती त्या रस पिळून काढलेल्या साली आणि बाठे चोखण्यामध्ये! आंबा घालून केलेला गोडशिरा खातानाही पोटात नेहमीपेक्षा चार घास जास्तच जातात. मस्तपैकी मोहरी लावून केलेली कैरीची कढी ठसका देऊन जाते, तर गोऽऽड मोरंबा अगदी आपल्या आवडीची भाजीही नावडती ठरवायला लावतो... कोणत्याही रूपामध्ये "आपला' वाटणारा हा आंबा खरं तरं आला पूर्वेकडच्या देशांतून. असं म्हणतात की बर्मा, सयाम, इंडोनेशिया या पट्ट्यामध्ये आंब्याने जन्म घेतला. काहींचं म्हणणं मात्र थोडं वेगळंय. ते म्हणतात हापूसचं कलम आलं मेक्‍सिकोमधून. कुठून का येईना, ते कोकणात रुजल्यानंतर त्याला चढलेली गोडी काही निराळीच! खुद्द मेक्‍सिको, बर्मातल्या आंब्यालाही काही त्याची सर येणार नाही!!! आंब्याला आपलंसं करणाऱ्या प्रत्येकाला या आंब्याने काही ना काही तरी दिलं. पिकवणाऱ्याला रोजगार आणि खाणाऱ्याला आनंद! आंबा या एका फळामध्ये किती जणांना आणि किती प्रकारचा रोजगार मिळतो आणि ही इंडस्ट्री किती मोठी आहे, याची कल्पना आकडे पाहिल्यानंतर येते. आंबा निर्यात तर केला जातोच; पण आंबा पोळी, आंबोशी, कॅन्ड आमरस, पल्प, तयार पन्हं या उद्योगामध्ये अनेकांना रोजगार मिळतो. कोकणातला आंबा बागाईतदार हा त्या झाडांवर मुलांप्रमाणे प्रेम करतो. वेळी - अवेळी पडणारा पाऊस त्याच्या हृदयाचा ठोका चुकवतो. झाडावरून फळं उतरवून त्याची आढी घालेपर्यंत त्याच्या जीवाला शांती नसते. आंब्याचा व्यापार करणाऱ्याच्या बाबतीतही हेच. आपल्याकडे आलेलं फळ ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत सर्वोत्तम असावं हीच त्याची धडपड असते. जातीचा आंबा विक्रेता कधीही पेटीला "पुडी' लावत नाही. आंबे लवकर पिकण्यासाठी "पावडर' द्या सांगणाऱ्या ग्राहकालाही तो दम देतो. आंबा नीट पिकण्यासाठी जितकी काळजी विक्रेत्याला घ्यायला लागते तितकीच घरी पेटी आणणाऱ्यालाही. कारण आंब्याची पेटी नीट लावणं ही वाटतं तितकी साधीसुधी गोष्ट नाही. त्यातही एक कला आहे. सगळे आंबे बाहेर काढून त्यांची वर्गवारी करायची. अगदी कच्चे आंबे एकदम तळाशी...मग त्यावर पेंढा...त्यावर मध्यम पिकलेले आंबे आणि पेंढा..आणि सगळ्यात वर तयार आंबे... हे सगळे आंबेही एकाच दिशेने लावायचे..तेही एकमेकांना स्पर्श होऊ न देता. कारण एक आंबा खराब झाला तर त्याच्या आजूबाजूचेही खराब होणार... आपल्या खाद्य जीवनात आंब्याला जितकं महत्त्वाचं स्थान आहे, तितकंच आंब्याच्या झाडालादेखील! सण कोणताही असो तोरणामध्ये आंब्याची डहाळी असतेच! मंगलकलशामध्ये श्रीफलासोबत आंब्याचीच पानं असतात आणि शुद्धीसाठी घरभर या मंगलकलशातल्या पाण्याचा शिडकावा होतो तोही आंब्याच्या पानानेच! आंब्याच्या झाडाकडे कधीही पाहा...ते मलूल दिसत नाही. मग त्याला नव्याने आलेली तांबूस पालवी असो की मोठी जून झालेली हिरवीगार पानं. मोहरलेला आंबा किंवा हिरव्यागार कैऱ्यांनी लगडलेला...प्रत्येक रूप सुखावणारंच असतं...! या झाडाची फळंही बहुतेक हाच संदेश देत असावीत...वर्षातून काहीच महिने मिळणारं हे फळ नाना चवी आणि रूपांतून वर्षभराचा आनंद देऊन जातं. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे किती पैलू असू शकतात, हे आंब्याच्या उदाहरणावरून शिकण्यासारखं आहे. बाजारात असूनही सध्या मध्यमवर्गाच्या आवक्‍याबाहेर असलेला आंबा लवकरच घराघरात येईल, तेव्हा यंदा जेवण थोऽडं कमी करून आंब्याचा आस्वाद घ्या... येणारा मोसम तुम्हाला "आंबामय' जावो.....

No comments: