Thursday, June 21, 2007

सुरेख आणि सुरेल

शास्त्रीय संगीत, त्यातले राग आणि त्यांचे गायक या विषयीच्या लेखांचे पुस्तक...म्हणजे साधारण काय चित्र डोळ्यांपुढे येतं..?? तर जुन्या बांधणीतलं पुस्तक, प्रत्येक रागानुसार किंवा त्याच्या वेळेनुसार केलेली प्रकरणांची विभागणी...आणि रागाचं नाव, थाट, वादी, संवादी, आरोह-अवरोह अशी होणारी प्रत्येक प्रकरणाची सुरुवात !! या सगळ्या प्रकरणाला छेद देत शास्त्रीय संगीताविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल, तर "नादवेध' वाचून पाहा... अच्युत गोडबोले आणि सुलभा पिशवीकर या दोघांच्या लेखमालेचे हे पुस्तक. शास्त्रीय संगीतातलं काही कळण्यासाठी संगीताची भाषा समजावी लागते आणि खूप काही बारकावे कळावे लागतात, अशी तुमची समजूत असेल तर पुस्तकाच्या सुरुवातीलाच हा समज गळून पडतो. कारण आपल्या मनोगतातच गोडबोले म्हणतात, ""मला गाण्यातल्या पंडितांपेक्षा गाण्यावर प्रेम करणारेच नेहमी जवळचे वाटत आलेले आहेत. रागदारीतलं काही "कळण्यापेक्षा', त्यातलं "भावण्याच्या' दृष्टीनं "ऐकणं' जास्ती महत्त्वाचं आहे.'' आणि या पुस्तकातले लेखही याच स्वरूपात आणि याच भावनेने लिहिलेले आहेत. शास्त्रीय संगीताच्या अगदी उगमापासून ते यातील वेगवेगळे राग आणि या रागातल्या रचनांविषयी या लेखांमध्ये खूप काही माहिती आहे. वेगवेगळ्या रागांच्या उगमाबद्दलच्या कथा, या रागातील रचनांबद्दल माहिती आहेच; पण हे राग गाताना मोठ्या गायक-वादकांबाबत घडलेले किस्सेही लेखकद्वयी अगदी ओघात सांगून जाते. भैरव, मल्हार, मारव्यापासून ते अगदी बिलावल - पटदीपपर्यंतच्या सगळ्या रागांवर या लेखमालेत चर्चा आहे. मग यात "भैरव'विषयी बोलताना नुसता "भैरव' असा उल्लेख न होता "भैरवकुला'चा उल्लेख होतो आणि त्यात कालिंगडा, रामकली, जोगिया या भैरव रागाच्या प्रकारांची माहितीही आहे. त्यातही कोणत्या प्रकाराचा स्वभाव कसा आहे, कुठे भैरवपेक्षा थोडे वेगळे सूर लागतात, इथपर्यंतचे तपशील या लेखात मिळतात. कोणत्या गायकाने गायलेला कोणता राग हा आवर्जून ऐकण्यासारखा आहे, एकच राग वेगवेगळे गायक कोणत्या पद्धतीने गातो याचे फार सुंदर विश्‍लेषण या लेखांमध्ये आहे. यात अगदी पंडित पलुस्कर, मोगूबाई कुर्डूकरांपासून ते आताच्या आरती अंकलीकर, संजीव अभ्यंकरांपर्यंत सर्वांचे उल्लेख येतात. रागांविषयी बोलताना विशिष्ट रागाच्या स्वरसंचाबद्दल किंवा त्या रागाच्या स्वभावाबद्दल चर्चा ही होतेच. या रागात कोणत्या प्रसिद्ध रचना बांधल्या गेल्या आहेत याचीही चर्चा होते, पण या लेखांबाबतीत एक गोष्ट वेगळी आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वेगवेगळे भाव अचूक टिपणाऱ्या अनेक कवितांचा उल्लेख या लेखांमध्ये आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर महानोरांच्या कवितेच्या ओळी आहेत,
"फुलात न्हाली पहाट ओली,
क्षितिजावरती रंग झुले,
नभात बिजल्या केशरियाचे,
रंग फुलांवर ओघळले.'
या ओळींमध्ये लेखकांना "भटियार' रागाचे रंग दिसतात. सूर्योदयाच्या वेळी गायल्या जाणाऱ्या या रागाचे रूप या कवितेत आहे हे आपल्यालाही चटकन भावते. कवितांचे असे सुंदर उल्लेख आणि तुलना बहुतेक लेखांमध्ये आहेत. एखाद्या रागाविषयी चर्चा करताना नुसतीच त्या रागातील शास्त्रीय चिजांची चर्चा न करता, त्या त्या रागाचे वैशिष्ट्य दाखवणाऱ्या वा या रागात बांधलेल्या अनेक हिंदी-मराठी गाण्यांचे संदर्भ या लेखांमध्ये येतात. "पूरबसे सूर्य उगा, फैला उजियारा जागी सब दिशा दिशा, जागा जग सारा' ही गाजलेली जाहिरात आठवते? "भटियार' विषयी बोलताना माणिक वर्मांच्या "बरनी न जाय' या बंदिशीचा उल्लेख तर आहेच, पण फार पूर्वी गाजलेली ही साक्षरता प्रसाराची जाहिरातही "भटियार'मध्ये आहे, हा संदर्भ दाद देण्याजोगा आहे. रागांवर आधारित हिंदी-मराठी चित्रपटगीते, भावगीते आणि नाट्यगीतांची यादी परिशिष्टांच्या स्वरूपात पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली आहे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे, यात नुसत्या जुन्या जमान्यातल्या गाण्यांचे उल्लेख नाहीत, तर अगदी आताच्या गाण्यांचे उल्लेख आहेत. अगदी "उडनखटोला' पासून ते शंकर महादेवनच्या "ब्रेथलेस'पर्यंत ! शास्त्रीय संगीतासारखा विषय तसा समजवण्यासाठी अवघडच. पण असा विषय कुठेही कंटाळवाणा होऊ न देता अतिशय रंजकतेने मांडल्याबद्दल सुलभा पिशवीकर आणि अच्युत गोडबोले यांना "दाद' द्यायलाच हवी. सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या गोडबोलेंचे वेगळेच रूप या लेखांतून पुढे येतं. हे सर्व लेख अभ्यासपूर्ण आहेत आणि पुस्तकाच्या शेवटी असणारी संदर्भग्रंथांची यादी पाहता या लेखांसाठी घेण्यात आलेली मेहनतही मानायलाच हवी. "नादवेध' वाचताना यात उल्लेख येणारी गाणी अगदी नकळत गुणगुणली जातात. दोन गाणी गुणगुणल्यावर या गाण्यांतलं साम्य आणि रागाची झलक आपल्याही लक्षात येते. पण पहिली दोन गाणी आठवली आणि तिसरं आठवलं नाही तर अस्वस्थ व्हायला होतं. मग हे गाणं मिळवण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपण "झपाटून' जातो. असं हे "झपाटून' जाणं अनुभवायचं असेल तर "नादवेध' नक्की वाचा !

No comments: