आधुनिक रक्तपेढी
ऐन इमर्जन्सीच्या वेळी रक्तासाठी धावाधाव करायला लागणे काळजीत भर टाकणारे असते. त्यातूनही ज्या गटाचे रक्त हवे तो दुर्मिळ असेल, तर दुष्काळात तेरावा महिना. त्यातून जर एखाद्या रक्तपेढीत रक्त उपलब्ध असेल, तर ते मिळण्यासाठी आधी तिथे एखादा रक्तदाता उभा करावा लागतो. रक्तदात्यांसाठी आणि रक्ताची गरज असणाऱ्यांसाठी या सगळ्यापेक्षाही वेगळा असा एक पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय आहे एक वेबसाइट! http://www.indianblooddonors.com या वेबसाइटमुळे आता रक्त मिळविण्याची प्रक्रिया सोपी झालेली आहे. या साइटद्वारे रक्त मिळविण्याची प्रक्रियाही अगदी सोपी आहे. रक्तदात्यांसाठी या वेबसाइटवर एक सदस्यत्वाचा फॉर्म आहे. असे सुमारे 35000 रक्तदाते सध्या या वेबसाइटचे सदस्य आहेत. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीस रक्ताची गरज भासेल, त्या व्यक्तीने या वेबसाइटवर आपली गरज "पोस्ट' करायची. या व्यक्तीला वेबसाइटद्वारे एक ब्लड रिक्वेस्ट आयडी मिळतो. हा आयडी घेऊन पेशंटने मग साइटच्या टीमला फोन करायचा. या फोनवर तुम्ही खरंच गरजू असल्याची खातरजमा करून मग पुढची प्रक्रिया सुरू होते. एखादी गरज नोंदविली गेल्यानंतर या वेबसाइटच्या सदस्यांना संपर्क केला जातो. गरजू व्यक्तीच्या मागण्या पूर्ण करू शकतील आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर पोचू शकतील अशा व्यक्तींना एसएमएस आणि ई-मेलद्वारे संपर्क केला जातो. ज्या रक्तदात्यांना रक्त देणे शक्य असेल, ते याच एसएमएस वा ई-मेलला उत्तर देऊन आपला निर्णय कळवितात. इच्छुक रक्तदात्याला मग गरजू व्यक्तीचा संपर्क दिला जातो आणि मग पुढे ही प्रक्रिया पूर्ण होते. आपण नोंदविलेल्या मागणीचा आत्ताचा स्टेटस्ही पाहण्याची सोय या वेबसाइटवर आहे. नागपूरच्या खुश्रू पोचा यांच्या कल्पनेतून पाच वर्षांपूर्वी ही वेबसाइट सुरू झाली. सध्या या वेबसाइटचे 35 हजार सदस्य असून दररोज 50-60 नवीन सदस्यांची नोंदणी होत असल्याची माहिती पोचा यांनी दिली. रोज जवळजवळ 25 गरजू व्यक्ती या वेबसाइटवर रक्तासाठी मागणी नोंदवतात. बोगस पेशंट किंवा मधल्या मधे पैसे कमावण्याचा प्रयत्न करणारे एजंट यांच्याकडून फसवणूक होऊ नये म्हणून या वेबसाइटकडून विशेष काळजी घेतली जाते आणि मग त्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. एखाद्या व्यक्तीला काही दिवसांतच पुन्हा गरज लागली, तर त्याच आयडीवरून ही प्रक्रिया पुन्हा करता येते आणि आपली मागणी नोंदवितानाच त्या शहरात किती रक्तदाते आहेत, याचाही आकडा गरजू व्यक्तीला कळू शकतो. अनेक लहानलहान शहरांमध्येही या वेबसाइटचे नोंदणीकृत सदस्य आहेत. या वेबसाइटद्वारे तुम्ही रक्तदाता म्हणूनही लोकांपर्यंत पोचू शकता किंवा इतर मार्गांनीही या वेबसाइटला मदत करू शकता. या वेबसाइटच्या हेल्पलाइनसाठी तुम्ही तुमचा वेळ, कौशल्य पुरवू शकता किंवा पैशांच्या स्वरूपातही देणगी देऊ शकता.
संपर्कासाठी पत्ता ः खुश्रू पोचा, 127, न्यू कॉलनी, नागपूर- 440001.
दूरध्वनी- 9860510099
http://www.indianblooddonors.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment